नाशिक: पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बरखास्त करण्यात आलेली महिला आघाडी नव्याने पुनर्बांधणी करण्यासाठी पदे वाटपाचे नियोजन सुरू होते. यामध्ये जातिवाचक शिवीगाळ झाल्याने महिला पदाधिकारी यांच्यातील राडा थेट पोलीस ठाण्यात पोहचला.
पोलीस ठाण्यातच राडा: त्यानंतर पोलीस ठाण्यातच पुन्हा एकदा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर एकमेकांना भिडल्या. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या महिला पदाधिकारी शिवीगाळ करत एकमेकींवर धावून गेल्या. यावेळी उपस्थित पुरुष पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
जातिवाचक शिवीगाळ: कुठले पद घ्यायचे याबाबत चर्चा करत असताना शोभा मगर यांच्यासह त्यांचा मुलगा याने जातिवाचक शिवीगाळ केली, असा आरोप लक्ष्मी ताठे यांनी केला आहे. याशिवाय ज्या पक्षात शोभा मगर जातात तिथे त्या महिलांमध्ये वाद घालतात. शिवसेनेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासणारी ही महिला आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. शोभा मगर यांचा मुलगा धीरज मगर हा गुन्हेगार असून त्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, असेही ताठे यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात शिंदे गटात राडा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दोन गटातच रस्त्याच्या श्रेयावरून जोरदार राडा झाल्याची घटना ठाणे शहरात 3 फेब्रुवारी, 2023 रोजी घडली होती. ही घटना उल्हासनगर नजीक एस एस टी कॉलेज समोर भर रस्त्यात घडली होती. या जोरदार राड्यात दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जोरदार राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. अशा घटनांमुळे शिंदे गटातील दरी स्पष्ट दिसून येत आहे.