नाशिक - मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक सुरू झाली. नाशिक-औरंगाबाद रोडवरील मधुरम बॅक्विंट हॉलमध्ये ही बैठक पार पडली. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा आक्रमक झाला असून बैठकीपूर्वी राज्य शासनाने समाजासाठी केलेल्या घोषणांच्या परिपत्रकाची होळी करुन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या बैठकीला छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशा येथे ठरवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील मोर्चाचे समन्वयक देखील बैठकीला उपस्थित आहे. छत्रपती खासदार उदयन राजे भोसले यांचा संदेश त्यांचे भाचे यश राजे भोसले यांनी वाचला. 'मी समाज बांधवांसोबत आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मी अस्वस्थ असून समाजासाठी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी मी देईल. परंतु राज्य व केंद्र सरकारने आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्यावा,' असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.
या बैठकीमध्ये मराठा समाजातील सर्वच क्षेत्रांमधील पदाधिकारी उपस्थित आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला नाशिकमधून नवीन दिशा मिळणार आहे. आज खासदार संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती असल्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.