नाशिक - नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज केली. सामाजिक जाणीवा आणि नाशिकला लाभलेला साहित्यिकांचा इतिहास बघता हे संमेलन नाशिकला होणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे संमेलन नक्कीच आगळ वेगळ होईल -
कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल, या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी दिली. 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन मार्च महिन्यात नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात होणार असून आज दुपारी छगन भुजबळांसह शासकीय अधिकारी आणि साहित्यिकांनी या ठिकाणी पाहणी केली. हे संमेलन नक्कीच आगळ वेगळ होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक -
आलेल्या पाहुण्यांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे नाशिककर म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संमेलन सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येऊन पूर्णवेळ याठिकाणी ते काम बघतील, असे ते म्हणाले.
स्वागत करण्यास आम्ही इच्छुक आहोत -
साहित्य संमेलनासाठी योग्य जागेची निवड करण्यात आलेली आहे. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा कशा मिळतील याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या. यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य राहील तसेच देशभरातून येणाऱ्या या सर्वांचे स्वागत करण्यास आम्ही इच्छुक आहोत, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - नोकरीच्या आशेनं गाठलं इराण, पण रस्त्यावर भटकण्याची आली वेळ