नाशिक : नाशिक विभाग पदवीधर निवडणूकीच्या वेळी मला महाराष्ट्र काँग्रेस कार्यालयाकडून दोन चुकीचे एबी फॉर्म आले होते असा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांनी सत्यजीत तांबेंबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मी इतकी वर्ष झाली राजकारणात आहे.
पण अशा प्रकारे एबी फॉर्म कोण घेते आणि फॉर्म घेताना पाहत नाही हे चुकीचं आहे. आमदार सत्यजित तांबे यांना काँग्रेस अपक्ष सोडायचा असेल म्हणून ते आरोप करत असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
कॉंग्रेसमध्ये निश्चित काय झाले? : डॉ. सुधीर तांबे हे तीन वेळा निवडून आले आहे. त्यांनी मतदार संघात चांगले काम केले आहे. दोन महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना म्हणालो, तुम्हालाच निवडून देऊ पण निश्चित काँग्रेसमध्ये काय झाले, हे कळायला मार्ग नाही. ऐनवेळी जे झालं, ते विचित्र आहे याच्यात कोण दोषी आहे, याचा उलगडा अजून झाला नाही. शरद पवार साहेबांनी सांगितलं होते हा घरातला प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांनतर शिवसेना आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. शुभांगी पाटील यांना चांगली मते मिळाली ती काही कमी मते नाहीत.
म्हणून ते आरोप करत आहेत : महाविकास आघाडीने चांगले काम केले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तांबेंनी मतदार नोंदणी चांगली केली होती. त्याचा परिणाम त्यांच्या विजयात झाला पण मी इतकी वर्ष झाली राजकारणात आहे पण अशा प्रकारे कोण एबी फॉर्म कोण घेते आणि फॉर्म घेताना पाहत नाही, हे चुकीचं आहे. फॉर्म घेताना सर्व काही पाहिले जाते. यामुळे हे असे कसे झाले असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. सत्यजित तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहे, असे ते म्हणाले.
थोरातांनी बोलले पाहिजे : छगन भुजबळ पुढे म्हणाले की, यावर बाळासाहेब थोरात साहेबांनी आता बोलले पाहिजे. खरे काय झाले, हे थोरात साहेबच सांगू शकतात, असे माझे मत आहे. जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहे, त्यावरून मला वाटते की, सत्यजित तांबे काँगेसमध्ये परतणार नाही असेही भुजबळ यांनी सांगितले. तसेच नागपूर आणि अमरावतीमध्ये जो कौल आला, त्यावरून स्पष्टपणे कळतं की हवा बदलली आहे, असेही त्यांनी सांगितले.
बोलण्यात पुढे मागे झाले असेल : मला त्यांचे वक्तव्य माहित नाही. पण शिवाजी महाराज यांनी अन्याय विरोधात लढा दिला. जर औरंगजेब वगैरे नसते,तर त्यांच्या जागी कुणीतरी जुलमी राज्यकर्ते असतेच ना. मला असे वाटतं की आव्हाड यांचे बोलण्यात काही पुढे मागे झाले असण्याची शक्यता आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
सत्यजित तांबेंचे आरोप ? : सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, आम्ही प्रदेश कार्यालयाला 9 जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून कॉल केला. त्यानुसार 10 तारखेला माझा माणूस नागपूरला पोहोचला. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तो बसून राहिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला. दोन एबी फॉर्म घेऊन पाठवतोय. विधान परिषदेचे एबी फॉर्म असल्याने ते सीलबंद होते. 11 तारखेला सकाळी माणूस पोहोचला. फॉर्म भरायला सुरुवात केली. पाकिट फोडले तेव्हा चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचे समोर आले. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ते फॉर्म नव्हते. एक औरंगाबादचा आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघाचा फॉर्म असल्याचे कळले. एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयाने गहाळपणे का करावा? विशेष म्हणजे या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्षांची सही आहे. मी तातडीने निरोप दिला. पण नवा एबी फॉर्म आला तेव्हा त्यावर डॉ सुधीर तांबे यांचे नाव होते आणि दुसऱ्या पर्यायावर नील असे लिहिले होते. याचाच अर्थ या उमेदवाराच्या ऐवजी दुसरा उमेदवार टाकू शकत नाही हे क्लिअर होते. आता आपण आमदार झालो असलो तरी कुठल्याही पक्षात जाणार नसून अपक्ष म्हणूनच मतदारांचे प्रश्न सोडवर असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.
हेही वाचा : Dr Mohan Bhagwat On Ramrajya: भारत जगात खरे रामराज्य साकार करू शकतो - डॉ. मोहन भागवत