नाशिक- मुंबई आग्रा महामार्ग टोल नाक्यावर आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून, मंत्री छगन भुजबळ यांनी वाहतूक सुरळीत केल्याचे पाहायला मिळाले. नाताळच्या सुट्या आणि वीकएन्ड असल्याने मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे घोटी टोल नाक्यावर आज दोन किलोमीटरपर्यंत ट्राफिक जाम झाली होती. यावेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा थांबवून, टोल नाक्यावर स्वतः उभे रहात वाहतूक कोंडी सोडवली. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला, तसेच पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी टोल प्रशासनाला देखील सूचना दिल्या आहेत.
सलग आलेल्या सुट्यामुळे नागरिक पर्यटनासाठी पडले घराबाहेर
नाताळ सण आणि शनिवार, रविवारची सुटी मिळाल्याने, अनेक जण आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, अनेकांनी घरातच राहणं पसंत केलं होतं. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नागरिक घराबाहेर पडत असल्याने पर्यटन स्थळी नागरिकांची गर्दी वाढली आहे. नाशिकची धार्मिक, अध्यात्मिक स्थळ म्हणून ओळख आहे. मात्र आता शहर वाईन कॅपिटल म्हणून देखील पुढे आल्याने पर्यटक नाशिकमध्ये गर्दी करत आहेत.