नाशिक - भुजबळांनी नांदगाव मतदार संघ विसरावं, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असतांना केले होते. यावर छगन भुजबळांनी आपल्या शैलीत राऊत यांना उत्तर दिले आहे. मी जेव्हा शिवसेना मोठी करत होतो, तेव्हा संजय राऊत शिवसेनेत नव्हते. त्यामुळे नांदगाव मतदार विसरावा याबाबत मला शरद पवारांना विचारावे लागले, असा टोला भुजबळांनी राऊत यांना लगावला. नाशिकच्या भुजबळ फार्म येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'राऊत हे महाविकास आघाडीचे शिल्पकार'
संजय राऊत साहेब हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यामुळे या शिल्पाला तडा जाऊ नये. याची जबाबदारी शिल्पकाराची अधिक आहे, असेही भुजबळ म्हणाले. शिवसेना मोठी केली तेव्हा राऊत सेनेत देखील नव्हते, असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी नांदगांवचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांचा एकदा पाहुणचार करावा तसेच नांदगावचा नाद सोडून द्या, असा इशाराही त्यांनी दिला होता. यावर भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावत संजय राऊत कुठल्या उद्देशाने बोलले हे मला माहीत नाही, पण पाहुणचार घेण्याची मला सवय आहे. शिवसेनेत मुख्यमंत्री झालो असतो असे म्हटले, मात्र कुठल्याही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत यांनीही सामनाचे संपादक म्हणून काम केले. म्हणून त्यांना खासदार पद मिळाले, असेही छगन भुजबळ म्हणाले.
नांदगावमध्ये मी जे काम केले हे राऊत यांना बहुतेक माहित नसावे. कारण त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करावे लागते, असा टोला लगावत राऊत यांना मी नांदगावला आमंत्रित करतो, की त्यांनी या मतदारसंघात परत परत यावे. नांदगाव मतदारसंघ विसरा असे ते म्हणाले याबाबत मला पवार साहेबांशी बोलावे लागेल, असा इशारा देत नांदगावमध्ये गेल्या दहा वर्षांपासून आम्ही काम केले आहे. त्यामुळे मी नांदगावला कसे विसरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. आमचे नेते जयंत पाटील हे देखील नाशिकला येऊन गेले. त्यांनी शंभर प्लस आमदार निवडून आणा, असे आवाहन केले. याची आठवण देखील भुजबळांनी करून दिली.
हेही वाचा - Drug Case : दिवाळीपूर्वी वैचारिक कचरा साफ करण्याची गरज - सुधीर मुनगंटीवार