नाशिक : अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेत शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे. राष्ट्रवादीत बंडखोरीनंतर पवार विरुद्ध पवार असे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत गोंधळाचे वातावरण पहायला मिळत आहे. काही कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटात तर, काहींचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गटाला पाठिंबा आहे. शरद पवारांची दुसरी सभा आज छगन भुजबळांच्या मतदारसंघात झाली. त्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी येवल्यात सभा घेतली अशी बोचरी टीका भुजबळांनी पवारांवर केली आहे.
शरद पवारांचे माझ्यावर प्रेम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली, तर दुसरीकडे मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भुजबळांच्या पहिल्या नाशिक दौऱ्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. सभेत बोलतांना शरद पवार म्हणाले की, माझ्याकडून चूक झाली त्याची माफी मागण्यासाठी मी आलो आहे. मी कोणावरही टीका करण्यासाठी आलो नाही असे, म्हणत पवारांनी येवलेकरांची माफी मागितली. मात्र मी पुन्हा येईन तेव्हा तुम्हाला अशी चूक दिसणार नाही, अशी टीका पवारांनी भुजबळांचे नाव न घेता केली. दुसरीकडे शरद पवारांचे माझ्यावर प्रेम असल्याने ते भेटीसाठी आले आहेत असे म्हणत भुजबळांनी उपरोधिक टीका केली.
मला मुख्यमंत्री पदाची ऑफर होती : शरद पवार पहिली सभा आंबेगावला घेणार होते, नंतर येवल्याहून धुळ्याला जाणार होते. मात्र, नंतर सर्व सभा रद्द करण्यात आल्या. मग ते म्हणाले मला येवल्याला जायचे आहे. कारण भुजबळांवर त्यांचे फार प्रेम आहे. माझ्या माझगाव येथील जुन्या घरात एक हजार प्रतिज्ञापत्रे तयार केली होती. शरद पवार, कलमाडी, वासनिक, शीला दीक्षित, फर्नांडिस, माधवराव शिंदे, सोनिया गांधींचे पीए जॉर्ज म्हणाले तुम्ही काँग्रेसमध्ये या तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. मात्र, मी पवारांबरोबर राहिलो. त्यामुळे पवारांसोबत जाणारा 'मी' पहिला होतो, म्हणूनच मी पहिला प्रांताध्यक्ष झालो. त्यामुळेच मी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पहिली सभा पवारांनी माझ्याच मतदारसंघात घेतली. कारण तो माझा हक्क आहे, असे म्हणत भुजबळांनी शरद पवारांना टोले लगावले.
हेही वाचा - Uday Samant : ४० आमदारांच्या निर्णयाबाबत आमची बाजू विधानसभा अध्यक्षांसमोर मांडू - उद्योगमंत्री उदय सामंत