नाशिक - श्री क्षेत्र चंदनपुरी येथील यात्रोत्सवास साधेपणाने सुरुवात झाली आहे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे, असे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी खंडोबाला साकडे घातले आहे. कोरोनाकाळात प्रशासनाने यात्रोत्सवास बंदी घातली आहे. मात्र भंडारा-खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र चंदनपुरीत दिसून आले आहे.
यात्रोत्सवास साधेपणाने सुरुवात
दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणारा मालेगाव चंदनपुरी येथील यात्रा यंदा साधेपणाने सुरु करण्यात आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक पूजा करून या उत्सवाला प्रारंभ केला. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा उत्सवाला परवानगी दिली नाही, तरी यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे.
सदानंदाचा जयघोष
येळकोट येळकोट जय मल्हार.. सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात व मुक्तपणे भंडारा खोबऱ्याची उधळण करीत आज उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील यात्रोत्सवास साधेपणाने सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीनुसार भुसे यांनी सपत्नीक पालखीचे पूजन करत, विधिवत खंडोबाची तळी भरली.
'संकट अजून टळलेले नाही'
चंदनपुरी हे खंडेराव महाराज यांची दुसरी पत्नी बानूबाई यांचे माहेर हे जेजुरीनंतरचे महत्त्वाचे स्थान आहे. बानूने खंडेराव महाराजांची चाकरी केली आणि महाराज बानूच्या प्रेमात पडले, अशी आख्यायिका आहे. बानू आणि खंडेराव महाराज यांच्याप्रती आठवणी जागविण्यासाठी दरवर्षी पौष पौर्णिमेला येथे यात्रा भरते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदा परवानगी नाकारली असल्याने यात्रोत्सव रद्द करण्यात आला. मात्र खंडोबा हे भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कोरोनाचे संकट अजून टळलेले नसल्याने उत्सवकाळात भाविकांनी गर्दी करू नये, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन भुसे यांनी भाविकांना केले आहे.