नाशिक - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केली आहेत. परिणामी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीची 'चैत्रोत्सव' यात्राही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांना या यात्रेस मुकावे लागणार आहे. रामनवमीपासून ( दि. २१ एप्रिल) ते चैत्र पौर्णिमेपर्यंत (२७ एप्रिल) होणारा हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.
ऑनलाइन दर्शन सुविधा
चैत्रोत्सवासाठी सुमारे दहा लाखांवर भाविक दर्शनासाठी गडावर हजेरी लावतात. आदिमायेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी नित्य दैनंदिन पूजाविधी सुरू आहेत. देवीचे घरबसल्या दर्शन व्हावे यासाठी लाइव्ह ऑनलाइन दर्शन सुविधा ट्रस्टच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांनी नाराजी
कोरोना संसर्गाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन भाविकांनी घरात बसूनच ऑनलाइन दर्शन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. दरम्यान, चैत्रोत्सव रद्द झाल्याने यात्रोत्सवावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सप्तशृंगगडावर शेती व इतर उत्पनाचे साधन नसल्या कारणांमुळे येथे केवळ नारळ, प्रसाद, खेळणी हाॅटेल व इतर व्यवसायावर अवलंबून राहावे लागते. परिणामी पुढे पावसाळ्याचे दिवस आहे. या दिवसासाठीच सप्तशुंगी गडावरील ग्रामस्थ चार महिन्यासाठी ( पावसाळ्यात) आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने सर्व धार्मिक स्थळ बंद केले आहेत. परिणामी गडावरील ग्रामस्थांसह व्यापारी वर्गापुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे.
खबरदारी घेण्याचे ट्रस्टच्यावतीने आवाहन
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता राज्य शासनाने जारी केलेल्या संचारबंदीमुळे राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करण्यात आले आहे. पर्यायी यावर्षीचा चैत्रउत्सव-२०२१ हा रद्द करण्यात आला असून विश्वस्त संस्थेच्यावतीने भाविकांना ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांनी सदर ऑनलाईन दर्शनाच्या माध्यमातून श्री भगवतीचे दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सप्तशृंगी देवी ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.