नाशिक- अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं यास माझा विरोध नाही, असं मत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ आज प्रथमच नाशिकला आले होते. यावेळी भुजबळ यांना माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले.
हेही वाचा- बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडांची कत्तल करण्यास विरोध - अमृता फडणवीस
गेल्या दीड महिन्यात मुंबईत अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या, म्हणून मी नाशकात येऊ शकलो नाही. मंत्री म्हणून नाशिकला येणार हे माझ्यासाठी वेगळी गोष्ट आहे. मागील पाच वर्ष अत्यंत खडतर गेली. भुजबळ संपले, असे अनेक लोकांना वाटत होते. मात्र, शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने पुनश्च हरिओम झाले आहे. आजचे हे दृश्य म्हणजे माझ्या आयुष्यातील सिनेमा असल्यासारखं वाटत आहे. पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यामुळे नाशिक शहरात असलेली अनेक अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक विकास कामांसह मागील सरकारने बोट क्लब मधील बोटी हलवल्या त्यामुळे पुन्हा एकदा बोट क्लब सुरू करणार असे भुजबळ म्हणाले.
खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असून येत्या दोन दिवसात हा प्रश्न मिटेल. मात्र, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे याला माझा विरोध नाही. या संदर्भात शरद पवार साहेब निर्णय घेतील. या सरकारमध्ये सर्व पक्षातील अनुभवी नेते असणार आहेत. मात्र, सरकारला थोडा वेळ द्या. मग टीका करा. एकनाथ खडसे हे मला भेटले आहेत. भाजपमध्ये ओबीसी नेते नाराज आहेत. खडसेंच्या या आरोपात तथ्य आहे. मात्र, हा सर्वस्व भाजपचा अंतर्गत प्रश्न असून खडसे कोणाला भेटले म्हणजे त्या पक्षात गेले असा होत नाही. खडसे अनुभवी नेते असून ते योग्य निर्णय घेतील, असेही ही भुजबळ म्हणाले.
समाजात विकृत गुन्ह्यात वाढ झाली असून,अशा नागरिकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. जो त्वरित कारवाई करणार नाही तो पोलीस अधिकारी जबाबदार धरला जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.