नाशिक - पिंपळगाव येथे नाशिक आणि दिंडोरी येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कवितांनी सभेत रंगत आणली.
नरेंद्र मोदी चौकीदार हे, राहुल गांधी भागीदार हे, मोदी फकीर हे, राहुल गांधी अमीरो की लकीर हे, मोदी विकास पुरुष हे,
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची आमच्याकडे आहे, फार मोठी जंत्री, म्हणून नरेंद्र मोदी होणार प्रधानमंत्री,
अशा कविता आठवले यांनी सादर करताच उपस्थित नागरिकांनी त्यांना दाद दिली. मोदी हे संविधान विरोधी नसल्याचे स्पष्ट करत, राहुल गांधी म्हणतात गरिबाला वर्षाला 72 हजार रुपये देऊ. मात्र मोदींनी आयुष्यमानच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये दिले. विरोधकांकडे पंतप्रधान पदाचे अनेक उमेदवार आहेत. शरद पवार देणार का राहुल गांधी यांना पाठिंबा, असे आठवले यांनी यावेळी सवाल केला. आमच्याकडे नरेंद्र मोदी हे एकच पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे आठवले म्हणाले.
यावेळी मोदींसह व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदार संघातील भाजपच्या उमेदवार भारती पवार व्यासपीठवर उपस्थित होते.