नाशिक - इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो गावात डोंगराच्या पायथ्याशी राजेंद्र तांदळे यांचे शेतात एक घर आहे. ते गावात राहत असले तरी शेतीकामासाठी आल्यानंतर तांदळे परिवाराची या घरात रेलचेल असते. तीन दिवसांपूर्वी तांदळे हे नेहमीप्रमाणे शेतातील घरी गेले असता, त्यांना घरात बिबट्यांचे चार बछडे आढळून आले. त्यांनी याची माहिती तात्काळ वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरा तसेच सीसीटीव्हीही लावण्यात आला. रात्रीच्या सुमारास बिबट्या मादी या घरात येऊन गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये मातेला पाहताच या बछड्यांची तडफड पाहायला मिळाली. यावेळी मातेने बछड्यांना पोटाशी धरून, मायेने तिने चारही पिलांना गोंजरले. त्यानंतर बराच काळ तिने बछड्यांसोबत व्यथित करून ती परत जंगलात निघून गेली.
इगतपुरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, बिबट्या मादीने बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी या घराचा आसरा घेतला असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, बिबट्या मादीने बछड्यांना या घरात ठेवल्याने तिचा परिसरात वावर कायम राहणार असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.