दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील ४९ ग्रामपंचायचीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काल बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी दिंडोरी तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे जनावरांच्या घोळक्याला रस्ता मिळाला नाही. यामुळे सर्व जनावरे तहसील कार्यालयात घुसली आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसह उपस्थितांची एकच तारांबळ उडाली.
घडले असे की, दिंडोरी तहसील कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे त्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तेव्हा चरण्यासाठी निघालेल्या जनावरांच्या घोळक्याला रस्ताच राहिला नाही. गोवंश थेट तहसील कार्यालयात घुसले.
जनावरे पाहून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह उपस्थितांची तारांबळ उडाली. अनेकांना वाटले की, गोवंशांना घेऊन कोणीतरी मोर्चा काढला असेल. पण जेव्हा संपूर्ण घटना कळली. तेव्हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, जनावरांच्या धडकेने तहसील कार्यालय परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचे काहीप्रमाणात नुकसान झाले.
हेही वाचा - नाशिक शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री; मनुष्यांसह पक्षांनाही दुखापत
हेही वाचा - नवीन वर्ष घरात राहूनच साजरे करावे; जिल्हाधिकारी सुरज मांढरेंचे नाशिककरांना आवाहन