नाशिक - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. बागलाणमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची दुहेरी लढत रंगली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बागलाणमधील दोन्ही उमेदवारांनी प्रचारसभांतून एकमेकांवर आरोपाच्या तोफा डागायल्या सुरुवात केली आहे. त्यातच बेलगाम सोशल मीडियाला हाताशी धरून राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण आणि भाजपच्या दिलीप बोरसे यांनी कार्टूनवॉर सुरू केले आहे. सोशल मीडियावर या कार्टून्सने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नेहमीच विविध माध्यमांचा आधार घेत असतात. राजकारणात सोशल मीडिया वॉर नवीन नाही. एकमेकांच्या नेत्यांना कार्यकर्ते आणि सोशल मीडिया सेलच्या मदतीने ट्रोल करण्याची संधी हल्ली सगळेच पक्ष घेताना दिसतात. यात बागलाण सारखा ग्रामीण व आदिवासीबहुल तालुकाही आघाडीवर आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम
राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपिका चव्हाण आणि भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या कडून एकमेकांवर टीका करण्यासाठी थेट व्यंगचित्रांचे अस्त्र उगारत एकमेकांना फटकारे मारले जात आहेत. ही अनेक व्यंगचित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेण्याबरोबरच सर्वांचे मनोरंजन आणि विचार करायला भाग पाडत आहेत.
बागलाणमध्ये बोरसे आणि चव्हाण यांच्यात विजय मिळविण्यासाठी अटीतटीची लढाई सुरू आहे. जशास तसे उत्तर देण्यासाठी दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मतदारही या वाकयुद्धाचा व कार्टूनवॉरचा अनुभव व आनंद घेत आहेत. राष्ट्रवादीकडून युतीचे बोरसे याचे तर युतीकडून राष्ट्रवादीचे चव्हाण यांची विविध व्यंगचित्र तयार करण्यात आली आहेत.
हेही वाचा - देशभरातील २० हजार एचएएल कर्मचारी बेमुदत संपावर
राष्ट्रवादीच्या कार्टूनमध्ये भाजपच्या बोरसे यांचा संपर्क कसा कमी आहे, त्यांना त्यांच्या गावाकडचा रस्ताही तयार करता आला नाही, तर ते मतदारसंघाचा काय विकास करतील, अशाप्रकारचा टोला लगावण्यात आला आहे. तर भाजपने व्हायरल केलेल्या कार्टूनमध्ये आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कशा बदल्या करण्यात आल्या, त्यांनी निवडणूकीआधी सेनेत प्रवेशाचा केलेला प्रयत्न कसा फसला, यावर बोट ठेवण्यात आले आहे.