येवला (नाशिक)- गेल्या काही दिवसांत शेतमालाचे भाव पडत असल्याने नाशिकमधील शेतकऱ्यांवर हताश होण्याची वेळ आली आहे. सध्या बाजारपेठेत कांदा टॉमेटो आणि वांग्याला अक्षरश: कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे संतापलेल्या येवल्यातील शेतकऱ्याने दोन एकरावरील वांग्याचे पीक उपटून जमीनदोस्त केले.
कॅरेटला 50 ते 60 रुपये भाव ....
येवला तालुक्यातील नागडे गावातील भारत भावसार या शेतकऱ्यांनी २ एकर शेतात वांग्याचे पीक घेतले होते. मात्र वांग्याला एका कॅरेटला 50 ते 60 रुपये भाव मिळत होता. काबाडकष्ट करून घेतलेले वांग्याचे पीक, त्यावर केलेला खर्च तसेच वाहतूक खर्च निघणेदेखील मुश्किल झाले असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सर्व वांग्याचे पीक उपटून फेकून दिले.
शेतकरी संकटात....
कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट अशा संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी विविध पिके घेतली. मात्र, दरवर्षी शेतकरी पीक घेतात आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसार सहन करावे लागते. भावसार आगोदर कांद्याचे पीक घेणार होते मात्र, कांद्याच्या बाजारभावात नेहमी चढ-उतार होत असल्याने आणि रोपेही शिल्लक नसल्यामुळे त्यांनी वांग्याचे पीक घेण्याचे ठरविले. दोन एकरात वांग्याची लागवड केली. वांग्याचे पीक चांगल्या प्रकाराने आले, मात्र बाजार भाव मिळत नसल्याकारणाने उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि काढणी मजुरी खर्चही निघणे मुश्कील झाले त्यामुळे संतापाच्या भरात भावसार यांनी दोन एकरावरील उभे वांग्याचे पीक उपटून जमीनदोस्त केले. त्यामुळे परत एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.