नाशिक - येवला तालुक्यातील विखरणी येथे शेतातील विहिरीत दोन काळवीटांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करताना किंवा आपापसातील झुंजीदरम्यान ही काळवीटे विहिरीत पडली असावीत, असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - कोल्हापुरातील आंबा घाटात दरड कोसळण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद
येवला भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे नदी-नाले कोरडे आहेत. याचा सर्वात जास्त फटका वन्य प्राण्यांना बसत आहे.
दरम्यान, गेल्या आठ महिन्यात दोन हरिण आणि चार काळविटांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. येवला परिसरात विहिरींना कठडे नसल्याने या विहिरी प्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत, असे प्राणी मित्रांचे मत आहे.