नाशिक - मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. येत्या श्रावण सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर भाजप आध्यात्मीक आघाडीच्या वतीने राज्यभरात शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
मंदिरावर अवलंबून असलेल्यांची उपासमार सुरू
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारने विविध निर्बंध लादले आहेत. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल त्याप्रमाणे निर्बंधात शिथिलताही करण्यात येत आहे. मात्र, या सरकारने मंदिरातील देवी, देवतांना कडी-कुलुपात कैद केले आहे. यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्यांची उपासमार सुरू आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे व मंदिराचे दार सर्वांसाठी खुले करावे, अशी मागणी यावेळी भोसले यांनी केली आहे.
पूर्वीच दिली होती सरकारला मुदत
भाजपच्या राज्य अध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी सोमवारपर्यंत (दि. 23 ऑगस्ट) राज्य सरकारला मुदत देण्यात आली होती. पण, राज्य सरकारने कोणताही निर्णय त्यावर घेतला नाही. म्हणून गुरुवारी (दि. 26 ऑगस्ट) भाजपची राज्य आध्यात्मिक आघाडीच्या वतीने अध्यक्ष तुषार भोसले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन येत्या 30 ऑगस्टला असलेल्या श्रावणी सोमवारी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त साधून मंदिरे उघडण्यासाठी संघटना राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
मंदिर हम खुलवाएंगे धर्म को न्याय दिलाएंगे
मंदिर हम खुलवाएंगे धर्म को न्याय दिलाएंगे, असा नारा देत शंखनाद आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे सरकार अतिशय दुर्दैवी पद्धतीने वागत आहे. देव-धर्मांवर सातत्याने अन्याय करत आहे. देवदेवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणाऱ्या या अधर्मी व जुलमी ठाकरे सरकार विरोधात रणशिंग हे फुकले जाईलच, असे त्यांनी सांगितले आहे. आंदोलनामध्ये साधू, महंत तसेच धार्मिक क्षेत्रातील विविध वर्गातील मान्यवर वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी हे सहभागी होणार असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - टोमॅटोला अडीच रुपये किलो भाव! शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात फेकून दिला माल