नाशिक - छत्रपती संभाजी महाराज हे राजे असून आम्ही शाहू, फुले व आंबेडकर यांचे भक्त आहोत. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटणार असल्याने ओबीसींनी विचलित होण्याची गरज नाही, अशा शब्दांत अन्नपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाजाला आश्वस्त केले.
हेही वाचा - नाशिक: स्कॉलरशिप मंजूर करून देण्याचे अमिष दाखवत लाखोंना लुटले
संभाजीराजे आरक्षण संदर्भात सावध पावले टाकत आहेत
भुजबळ फार्म येथे शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत आरक्षणासह विविध मुद्यांवर छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसे आंदोलन करावे, हे आम्ही काय सांगणार. पण, छत्रपती संभाजीराजे आरक्षण संदर्भात सावध आणि सय्यमी पावले टाकत आहेत. इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी ते घेतील, असा विश्वास छगन भुजबळ यानी व्यक्त केला.
मैत्री करायचे वाघाच्या मनावर असून वाघ पंजाही मारू शकतो
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता प्रशांत किशोर हे राजकीय पक्षांना यश मिळविण्याचे सल्ले देतात. त्यांचा निवडणूक विषयात हातखंडा आहे. त्यांनी काही सल्ला दिला तर पवार साहेब नक्की ऐकतील, असे मत भुजबळ यांनी मांडले. तसेच, शिवसेनेने भाजपविरुद्ध मवाळ भूमिका घेतली का? असे विचारले असता राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे असते. त्यामुळे, जमवून घ्यावच लागते, मात्र मैत्री करायचे हे वाघाच्या मनावर असून वाघ पंजाही मारू शकतो, असा टोला भुजबळ यांनी भाजपला लगावला.
बाळासाहेबांनी स्वत:चे नाव नाकारले असते
बाळासाहेब ठाकरे असते तर विमानतळाला स्वतःचे नाव नाकारले असते. त्यांनी जे.आर.डी टाटा नाव द्या, असे सांगितले असते. नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा. बाळासाहेब आणि दि.बा. पाटील या दोघांच्याही नावाला आमचा पाठिंबा असल्याचे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा - Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार