नाशिक - राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्तपदी नगरपालिका विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
अगोदरच्या आयुक्तांवर अविश्वास ठराव केला होता मंजूर -
मालेगाव महानगरपालिकेचे या अगोदरचे आयुक्त त्र्यंबक कासार यांच्यावर मार्च महिन्यामध्ये बहुमताने अविश्वास प्रस्ताव आणून तो पारित करण्यात आला होता. त्यापूर्वी कासार हे सुट्टीवर गेले होते. या दरम्यान मालेगाव शहरामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे आपत्ती निवारण समितीच्या बैठकीमध्ये त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर कासार हे कामावर हजर झाले परंतु, मालेगाव महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव आणला. तो प्रस्ताव पालिकेत सर्व सदस्यांनी सहमतीने मंजूर केला.
मालेगाव महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिका आयुक्त यांच्या विरोधात अविश्वास ठराव पास करण्यात आला. त्यानंतर कासार हे पुन्हा मालेगाव महानगरपालिकेमध्ये हजर झाले नाहीत. त्यांचा पदभार हा मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे देण्यात आला होता.