नाशिक - 'हम जहा खडे होते है लाईन वही से शुरू होती है' अमिताभ बच्चन यांच्या खणखणीत आवाजातील 'दीवार' चित्रपटातील हा डॉयलॉग तमाम चित्रपट शौकिनांना माहीतच असेल. अशाच प्रकारच्या प्रसिद्ध संवादांचा आधार घेत नाशिक शहर पोलीस सुरक्षित वाहतुकीसाठी जनजागृती करत आहेत.
हेही वाचा - नाशिक शहराची तहान भागवायची असेल तर पाणीकपात करा - सिताराम कुंटे
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात ठिकठिकाणी वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध संवादांचे फलक शहरात झळकताना दिसत आहेत.
रस्ता अपघातांमध्ये दरवर्षी लाखो लोक मृत्यू पावतात. हे टाळण्यासाठी राज्यात सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जात आहे. याच अनुषंगाने नाशिक शहर वाहतूक शाखेने अभिनव मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वीही गांधीगिरीच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्ती मोहीम राबवली होती. तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चौकाचौकात पथनाट्यांचे सादरीकरण करून वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृतीही केली होती. चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, यासाठी वाहतूक पोलीस नेहमीच आग्रही असतात.
हेही वाचा - मुंबईत आढळले कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात दाखल
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अपघातांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट केले होते. आयुक्तांच्या प्रयत्नांना अधिकारी, कर्मचाऱ्यांची साथ असली, तरी नाशकात अजूनही बेशिस्त वाहनचालकांची संख्या मोठी आहे. यात तरुणाई आघाडीवर आहे. वाहतूक नियमांची योग्य अंमलबजावणी होऊन अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी शहर वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत.