नाशिक - भाजपकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. मात्र, त्यात अनेक इच्छुक, विद्यमान आमदारांची नावे नव्हती. नाव नसल्याने अनेक इच्छुकांना डच्चू दिल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या यादीत नाव यावे यासाठी अनेकांनी भाजप नेत्यांकडे तळ ठोकला आहे. तर काहींनी आपल्या मतदारसंघातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे नाट्य सुरू केले आहे. त्यातच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर न केल्याने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप देखील अस्वस्थ झाले आहेत.
सानप यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील पंचवटी आणि त्रंबकेश्वर येथील भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला असून सानप यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. यावेळी बाळासाहेब सानप देखील उपस्थित होते. नगरसेवक बोलत असताना मात्र सानप यांना अश्रू अनावर झाले होते. अत्यंत भावूक होत पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर, मला तिकीट नाही, असे पालकमंत्री किंवा भाजप नेत्यांपैकी कुणी तोंडी देखील सांगितले नाही, असे सांगत सानप अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा- नाशिकमधील कांद्यावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर
दरम्यान, बाळासाहेब सानप यांचे पहिल्या यादीत नाव न आल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी चुकीचे विधान केले असतील. परंतु, आम्ही त्यांची समजूत घातली आहे. दुसऱ्या यादीत सानप यांचे नाव येईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी व्यक्त केला आहे.