नाशिक - विविध बँकांच्या एटीएम सेंटरमधून सामान्य नागरिकांचे डेबिट-क्रेडिट कार्ड चोरी करून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या सराईत गुन्हेगारावर याआधी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
मनमाड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील देना बँकेच्या एटीएममध्ये 4 जून रोजी संजय गांगुर्डे हे वृद्ध पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना एटीएममधून पैसे काढताना अडचण येत असल्याने, मागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देतो, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संजय गांगुर्डे यांनी एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड व पिनकोड दिला आणि पाच हजार रुपये काढून दिले. त्यानंतर या अनोळखी व्यक्तीने गांगुर्डे यांच्या डेबिट कार्डद्वारे शॉपिंग करून ७० हजार रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांनी मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपवला होता. या पथकाने विविध घटनास्थळावरील फुटेजची पाहणी केली. त्यातील संशयित आरोपी काही ठिकाणावर एकाच प्रकारे फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद गतीने तपास चक्रे फिरवत नाशिक शहरातील गणेशवाडी परिसरात छापा टाकला. त्यात तळ ठोकून असलेला सराईत गुन्हेगार माधव उर्फ सोनू बापू आहेर (रा. निफाड) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी मनमाड शहरातील रेल्वे परिसरातील देना बँक एटीएममध्ये एका व्यक्तीचा विश्वास संपादन केला. व त्याचे एटीएम व पिनकोड घेऊन त्यास पाच हजार रुपये काढून दिल्याचे सांगितले. यावेळी एटीएम कार्डची अदला बदल केली. त्या नंतर नाशिक मधील एका दुकानातून 70 हजाराचे दागिने खरेदी केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपीकडून सहा ते सात वेगवेगळ्या बँकेचे एटीएम जप्त केले आहे.
याआधी देखील माधव आहेर या आरोपीने अफरातफरी करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. यापूर्वी त्याच्यावर निफाड, पिंपळगाव, वणी पोलीस ठाणे तसेच नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर व उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गुरुळे, अशोक पाटील, रवींद्र वानखडे, संदीप हांडगे, जालिंदर खराटे, गिरीश बागुल, हरिष आव्हाड, गणेश नरोटे, प्रदीप बहिरम आणि हेमंत गिलबिले यांच्या पथकाने कारवाई केली.