नाशिक - पावसाळा सुरू होण्याआधी नगररचना विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात नाशिक शहरातील तब्बल 1184 वाडे धोकादायक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. य प्रकरणी हे धोकादायक वाडे रिकामे करून त्या मिळकत धारकांना धोकादायक वाडे, संबंधित भाग उतरवून घेण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी
नाशिक शहरातील धोकादायक वाड्याचे नगररचना विभागाकडून सर्वेक्षण करून तातडीने पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक वाड्यांच्या संदर्भामध्ये माहिती देताना मनपा आयुक्त जाधव यांनी सांगितले की वारंवार महानगरपालिकेच्या वतीने धोकादायक वाडे आणि वस्त्यांची सर्वेक्षण करण्यात येते. त्या पद्धतीप्रमाणे पुढील पावले ही टाकले जातात. परंतु पावसाळ्याच्या काळात अधिक खबरदारी घेतली जाते. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 1184 वाडे धोकादायक असल्याचे आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
अन्यथा मनपा प्रशासनाची कारवाई -
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार आता संबंधित वाडे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असून हे वाडे खाली न केल्यास मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. असे सांगून मनपा आयुक्त कैलास जाधव पुढे म्हणाले की, नागरिकांनी मदत केली पाहिजे म्हणजे होणारे नुकसान नागरिकांचे पण टळेल आणि परिस्थिती नियंत्रणात राहील असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले की यासाठी अधिक कडक कारवाई करण्याची गरज पडल्यास ही देखील मनपा प्रशासन करणार आहे. मागील वर्षी 723 धोकादायक वाड्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यावर्षी सुमारे साडे चारशे धोकादायक मिळकती वाढल्या आहेत.