नाशिक - नाशिक शहरात जमिन मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हा सर्व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सीसीटीव्ही कॅमरेही फोडण्यात आले
नाशिकच्या टाकळी रोड परिसरातल्या खोडे नगरमध्ये जमिनीच्या वादातून जुन्या आणि नव्या मालकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. थेट नव्या मालकाच्या ऑफिसवर दगडफेक करण्यात आली आहे. ऑफिसच्या काचा फोडण्यात आले. यावर हे भांडण संपले नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी दगड फेकून सीसीटीव्ही कॅमरेही फोडण्यात आले आहे. परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
जमीन बळकवण्याच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी विकलेली जमीन पुन्हा परत द्यावी, यावरून सुरू झालेला हा वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत जाऊन पोहचला. या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहे.