नाशिक - मालेगाव महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याविरुध्द सभागृहात आणलेला प्रस्ताव ८० विरुद्ध मतांनी मंजूर झाला आहे. त्यामुळे आयुक्त कासार यांची गच्छंती अटळ आहे. ठेकेदारांचे चुकीचे काम केले नसल्याने अविश्वास प्रस्ताव आणल्याचा आरोप आयुक्तांनी केला आहे.
मालेगाव महानगरपालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या विरोधातील कॉंग्रेस- शिवसेना, भाजप व एमआयएमसह सर्वपक्षीय सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत ८० विरूद्ध शून्य मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला.
हेही वाचा-पेट्रोल डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी कपात
ठेकेदारांचे चुकीचे काम केले नाही म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला ...
काँग्रेस, महागठबंधन आघाडी, शिवसेना, भाजप व एमआयएमसह सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिका आयुक्तांच्या अविश्वासाला पाठिंबा दिला. तीन सदस्य आजारामुळे अनुपस्थित होते. दरम्यान, या अविश्वास प्रस्तावाविरोधात आयुक्त कासार यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, कोरोना हॉटस्पॉटमध्ये मी काम केले. तेव्हा एकही नगरसेवक विरोधात बोलला नाही. मागील १४ वर्षांपासूनचे बिल काढण्यासंदर्भात मला गळ घातली जात होती. ठेकेदारांचे चुकीचे काम केले नाही. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव आणला असा आरोप सर्वपक्षीय सदस्यांवर केला.

हेही वाचा-घसरणीचा फटका; दोन दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांचे ७ लाख कोटी पाण्यात!
सरकार बदली आदेश देईपर्यंत काम करत राहणार
सदस्यांनी स्वतः काही ठराव केले. निविदा काम देण्यासंदर्भात माझ्यावर दबाव आणला. माझ्या विरोधात दबावतंत्र आणून माझ्या विरोधात मतदान करण्यास भाग पाडले. मला सामान्य जनतेमधून पसंती आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन सरकारला माहीत देणार आहे. सरकार बदली ऑर्डर देईपर्यंत काम करत राहणार असल्याचे असे आयुक्त कासार यानी सांगितले आहे.
सर्व पक्षांच्या संमतीने आज आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मंजूर
महापौर ताहेरा शेख म्हणाल्या की, आयुक्त आल्यापासून कुठलेही कामे वार्डातील होत नव्हती. म्हणून लोकप्रतिनिधींना नागरिक जाब विचारत होते. कामकाज होत नसल्याने हा आज अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे .सर्व पक्षांच्या संमतीने आज आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.