नाशिक - सिन्नर तालुक्यात राहणारे गणेशभक्त संजय क्षत्रिय हे गेल्या तेवीस वर्षापासून सूक्ष्म गणेशमूर्ती बनवण्याचा छंद जोपासता आहे. त्यांनी आतापर्यंत 35 हजार सूक्ष्म गणेश मूर्ती साकारल्या असून विशेष म्हणजे प्रत्येक मूर्ती वेगळी आहे.
सिन्नर येथील गणेशभक्त संजय क्षत्रिय हे घरांना रंग देण्याचे काम करत कुटुंब सांभाळत आपला छंद देखील जोपासत आहे. संजय यांनी पाव इंच ते तीन इंच पर्यंत अनेक गणेश मूर्ती साकारल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध आकारात 35 हजार गणेश मूर्ती साकारल्या आहेत. यासोबत त्यांनी 81 गणपतींची दोन फुटाची दहीहंडी, सुपारीवर 11 सूक्ष्म गणपती, 251 खडू वर सुईच्या सहाय्याने सुबक गणेश मूर्ती साकारल्या आहेत. तसेच कॅसेट कव्हरवर सुईच्या टोकाच्या सहाय्याने 1 हजार 111 गणपती मूर्ती व त्याखाली गणपती आरतीही कोरली आहे. विशेष म्हणजे सीमकार्डवर 21 गणपती साकारले आहे.
कलेचा आविष्कार -
संजय क्षत्रीय यांनी आतापर्यंत 11 हजार बाटल्याचे गणेश मंदिर, आगपेटी पासून बनवलेले दादरचे सिद्धिविनायक मंदिर, 25 किलो साबुदाणा पासून साकारला ताजमहल, 2 हजार आईस्क्रीम काड्यांपासून गणेश मंदिर, 81 बाल गणेशांची 10 थरांची दहीहंडी, 11 हजार सूक्ष्म गणपती पासून महागणपती, अडीच हजार खंडूपासून तयार केले आयोध्या मंदिर, साडेतीन लाख मण्यांपासून बनवले अमृतसर येथील सुवर्णमंदिर बनवले आहेत.
मूर्ती बनवताना मी तल्लीन होऊन जातो -
लहानपणी मी मित्रांबरोबर नदीकाठी खेळायला जायचो. काही वेळ आम्ही तेथे मातीपासून मूर्ती तयार करायचो. हातांना ती सवय होती. मोठे झाल्यावर एका ठिकाणी मला दगडावर कोरलेली मूर्ती दिसली. ते पाहून बालपणीची मूर्तिकला पुन्हा आठवली. पण वेगळं म्हणून जास्तीत जास्त छोट्या आकारातील मूर्ती घडवायचे ठरवले. यातील आव्हान मोठे होतं. सुरुवातीला सुपारीवर मावणारे 11 गणपती तयार केले. मग सुचलं नखावर मावणारे एवढेच गणपती तयार करून बघावे आणि ते ही यशस्वी झाले. मग त्यानंतर मला छंदच जडला रोज कामावरून आल्यावर मुर्त्या घडवायचो. मूर्ती घडवतांना मी पूर्णपणे तल्लीन होऊन जातो. मी तयार करत असलेल्या शाडू मातीच्या मूर्तींंना माझी पत्नी वंदना रंगवते, माझ्या मुली पूजा व अक्षदा या दोन्ही मला मदत करत मूर्ती रंगवून देतात, असे संजय क्षत्रिय यांनी म्हटले आहे.