नाशिक : जगाच्या पाठीवर जसा मनुष्याला जगण्याचा अधिकार आहे तसाच प्राण्यांना देखील आहे. भूतदया म्हणून अनेकजण प्राण्यांवर निस्वार्थी प्रेम करत असतात. नाशिकमधील असाच एक तरुण आहे ज्याने प्राण्यांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अनेकदा रस्त्यावर प्राण्यांचे अपघात होतात. मात्र जखमी अवस्थेत प्राण्यांना बघून देखील येणारे जाणारे नागरिक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागतो. त्यासाठी नाशिकचे प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांनी थेट प्राण्यांसाठी लोकवर्गणीतून हायड्रॉलिक रुग्णवाहिका तयार केली आहे. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आव्हाड यांनी शेकडो मुक्या प्राण्यांना जीवदान दिले आहे.
प्राणीमित्र आव्हाड यांचा परिचय : प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड हे गेल्या दहा वर्षांपासून मंगलरुप गोशाळेच्या माध्यमातून प्राण्यांची सेवा करत आहेत. रस्त्यावर अपघात ग्रस्त झालेल्या बैल, घोडा, बकरी, गाय अशा अनेक प्राण्यांना त्यांनी वेळेवर उपचार मिळून देत त्यांचे प्राण वाचवले आहे. दिवस रात्रीची पर्वा न करता हा अवलिया अपघात ग्रस्त प्राण्यांचा जीव कसा वाचेल याचाच विचार करत असतो.
हायड्रोलिक रुग्णवाहिका : अनेकदा अपघात ग्रस्त झालेल्या प्राण्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काही प्राण्यांचे वजन जास्त असल्याने त्यांना वाहनात बसवण्यासाठी 8 ते 10 लोकांची मदत घ्यावी लागत होती. त्यात वेळही खूप जात होता. त्यामुळे अनेक प्राण्यांचा मृत्यू ओढवत असे. हेच ओळखून आव्हाड यांनी हायड्रोलिक रुग्णवाहिका तयार केली केली. ही रुग्णवाहिका तयार करण्यासाठी त्यांना 14 लाखांचा खर्च आला असून त्यांनी लोकवर्गणीतून त्याला मूर्त रूप दिले आहे. शहरात कुत्रे मांजर यांच्यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र मोठ्या जनावरांसाठी काम करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आम्ही शेकडो जनावरांचे प्राण वाचू शकलो, असे प्राणिमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांनी सांगितलं.
रतन टाटा आहेत आदर्श : प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे समाजसेवा आणि पशुसेवेतील आदर्श म्हणून ओळखले जातात. रतन टाटांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आव्हाड यांनी बनवलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेवर रतन टाटा यांचा फोटो लावण्यात आला आहे. देशावर आलेल्या प्रत्येक संकटात रतन टाटा हे लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यामुळे या रुग्णवाहिकेचे टाटा यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे, अशी आव्हाड यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :