नाशिक - येवला नगरपालिकेने सहा महिन्याची घरपट्टी तसेच तीन महिन्याचे गाळेभाडे माफ करावे या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज नगर पालिकेत आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे घरपट्टी आणि गाळेभाडे माफ करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कोविड -19 महामारीमुळे मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले तर कित्येक जणांचे व्यवसाय ठप्प झाले. मात्र दोन महिन्यानंतर काही अंशीे दुकाने सुरू करण्यात आली मात्र ऑड इव्हन पद्धतीने दुकाने सुरू करण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा पुरेशा प्रमाणात व्यवसाय झाला नाही. परिणामी आर्थिक तंगी निर्माण झाल्याने घर खर्च भागवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्याची घरपट्टी माफ करावी तसेच तीन महिन्याचे गाळेभाडे माफ करण्यात यावे अशा मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली.
तसेच पालिका प्रशासनाने लादलेल्या ऑड इव्हन पद्धतीचा सुद्धा विचार करावा अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात नागरिक आणि व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.