नाशिक - सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करणार असल्याचे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील विविध गावांना शुक्रवारी भेट दिली.
हेही वाचा - खरिपाच्या पिकांची दुरवस्था; शेतकऱ्याने गाण्यातून मांडली व्यथा..
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील ३ लाख हेक्टर पेक्षा जास्त शेती बाधित झाली असून साडेचार लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. यात हंगामपूर्व द्राक्षांचे १०० टक्के नुकसान झाले आहे, तर बाजरी, मका, कांदा, डाळींब, भाजीपाला, कांदा रोपे, व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश खोत यांनी प्रशासनाला दिले. एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी महसूल व कृषी विभाग तसेच ग्रामसेवक यांनी घ्यावी व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
खोत यांनी बागलाण तालुक्यातील सटाणा, करंजाड, पिंगळवाडे, पारनेर-निताणे, बिजोटे, आखतवाडे, द्याने व परिसरातील गावातील नुकसानीची पाहणी केली. दरम्यान त्यांनी वायगाव येथील आत्महत्या केलेल्या केदा देवरे या शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल? यासाठी सरकार कटिबद्ध राहील. प्रशासनाने यामध्ये कुठेही दिरंगाई केल्यास त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कर्ज वसुलीसाठी जमीन लिलावाच्या नोटीसा आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर खोत यांनी संबधित बँकांना तत्काळ संबंधित वसुली थांबवण्याच्या सूचना देण्यात येतील. शेतकऱ्यापेक्षा कोणतीही व्यवस्था मोठी नाही. बँकांनी आततायीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी आश्वासित केले.
पीक विमा जून-जुलैमध्ये लागू झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यामुळे यावर पुनर्विचार केला जाईल. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे, त्यांनी केवळ पिकविम्याची पावती व एक अर्ज द्यावा. केंद्र व राज्य सरकार तसेच विम्याच्या माध्यमातून मदत व कर्ज पुनर्गठन संदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल देण्याचे व बागांना संकटांपासून वाचविण्यासाठी अनुदान व सवलतीत प्लास्टिक पेपर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिले.
हेही वाचा - 'मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा'