दिंडोरी (नाशिक) - ''विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतमालास योग्य हमीभाव मिळण्यासाठी शासनस्तरावर विक्री व्यवस्थापनाला बळकटी देणार आहे', असे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे ग्रामपंचायत सभागृह येथे शुक्रवारी (25 जून) 'विकेल ते पिकेल' अभियान आयोजित करण्यात आले. या अंतर्गत शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन राजस्तरीय कार्यशाळेत दादा भुसे बोलत होते.
महाराष्ट्रव्यापी एकदिवसीय ऑनलाईन शिबीर होणार
'शेतकरी राजा शेतात कुटुंबासह राबत असतो. त्याची प्रगती साधण्याच्या दृष्टीने विकेल ते पिकेल अभियानांतर्गत वाणाच्या बाजारातील मागणीनुसार शेतकऱ्यांनी शेतात पिक घ्यावे. जेणेकरून उत्पन्नास योग्य हमीभाव मिळेल. शेतकरी ते थेट ग्राहक असे विक्री व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून एक धोरण निश्चित केले जाणार आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी बीड मॉडेल सादर करण्यात आले आहे. तसेच द्राक्ष व सिताफळ या पिकांना विमा कवच देण्यात आले आहे. येणाऱ्या काळात शेतकरी, फार्मर प्राड्युसर कंपनी व शेतीमाल प्रक्रिया उद्योजक यांच्या सहभागाने महाराष्ट्रव्यापी एकदिवसीय ऑनलाईन शिबीराचे आयोजन केले जाणार आहे', असे दादा भुसे यांनी म्हटले.
देशभतात 13 हजार 877 कोटींची निर्यात एकट्या महाराष्ट्रातून
'गतवर्षी देशभरात एकूण 58 हजार 76 कोटी शेतमालाच्या निर्यातीपैकी 13 हजार 877 कोटींची निर्यात एकट्या महाराष्ट्रातून झाली. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आगामी काळात गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुढे यावे. कृषी विभागामार्फत एकाच छाताखाली शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिंगल विंडो प्रणालीची व्यवस्था संकेतस्थळावर करण्यात आली आहे. यात 30 टक्के योजना या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत', असेही दादा भुसे म्हणाले.
दरम्यान, या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व मृदा पुजनाने करण्यात आले. या कार्यशाळेत 53 शेती गटांनी शेतमाल प्रदर्शनाद्वारे सहभाग घेतला.
हेही वाचा - इंदिरा गांधीच्या भूमिकेत अवतरणार कंगना रणौत, 'इमर्जन्सी'ची तयारी सुरू!!