नाशिक - ग्रामीण भागातील ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी. तसेच ग्रामीण भागातील गृहविलगीकरणातील रुग्णांची यादी आरोग्य प्रशासनाने पोलीस प्रशासनास द्यावी आणि या रुग्णांवर वचक बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना कराव्या, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
नियमांचे काटेकोर पालन केल्यास लॉकडाऊनची आवश्यकता नाही -
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असून त्याला रोखण्यासाठी मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, अशा गावातील परिस्थितीचा विचार करून गावपातळीवर कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासह मालेगाव तालुक्यात पुरेसा रेमडेसिव्हीरचा साठा उपलब्ध करून द्यावा. सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन टँक तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. प्राथमिक पातळीवर नागरिकांनी उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन करतांनाच शिस्त व आरोग्य प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास लॉकडाऊनची आवश्यकता भासणार नाही, असेही मंत्री भुसे यावेळी सांगितले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधित करणे गरजेचे -
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधित करणे गरजेचे आहे. यासोबत कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढविण्याबरोबर कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करणे गरजेचे असून यातूनच कोरोना संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांचा संचार तात्काळ थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात यावी -
शहरासह ग्रामीण भागातील सर्व प्रतिबंधित क्षेत्रात तात्काळ बॅरेकेटींग करण्याच्या सुचना देतांना आयुक्त म्हणाले, प्रत्येक बॅरेकेटींग केलेल्या भागात सुचनांचे दर्शनी फलक लावण्यात यावे. या भागातील नागरिकांचा संचार तात्काळ थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात यावी. प्रत्येक बाधीत रुग्णामागे त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसींग करून अँटीजेन चाचण्यांवर भर देण्यात यावा. गृहविलगीकरणासह प्रतिबंधीत क्षेत्रातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करून अशा रुग्णांच्या मोबाईलमध्ये सक्तीने 'महाकवच’ ॲपचा समावेश केल्यास अशा रुग्णांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दर दिवशी आढावा घेण्यात यावा. मनुष्यबळाची बचत करण्यासाठी ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करण्याच्या सुचनाही विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी दिल्या आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय एचआरसीटी करू नये-
आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणी केल्यानंतरही काही लोक एचआरसीटी चाचणी करण्यासाठी आग्रही असतात. यामुळे एचआरसीटी सेंटर वाढू नयेत, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय एचआरसीटी चाचण्या करण्यात येवू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
हेही वाचा - चिंताजनक! शुक्रवारी राज्यात 47,827 नवे कोरोना रुग्ण