नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लग्न समारंभावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स आणि संबंधित व्यावसायावर अवलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यासाठी आज नाशिकमध्ये मंडप डेकोरेटर्स आणि संलग्न व्यवसायिकांकडून एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आणली आहेत. कोणत्याही धार्मीक, सामाजिक कार्यक्रमाला केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. याचा फटका मंडप डेकोरेटर्स आणि इतर व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे सरकारने हे निर्बंध हटवून किमान 500 लोकांना लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत, आज नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानात हे आंदोलन करण्यात आले.
काळ्या रंगाचे मास्क घालून सरकारचा निषेध
मंडप डेकोरेटर्स आणि संलग्न व्यावसायिकांकडून करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी पांढार शर्ट आणि काळे मास्क परिधान करून सरकारचा निषेध केला. तसेच आंदोलकांनी काळ्या छत्र्या दाखवून सरकारचे लक्ष आपल्या मागण्याकडे वेधले.
कर्ज भरण्यासाठी बँकेचा तगादा
कोरोना संकट सर्वत्र आहे. मात्र असे असतांनाही इतर व्यावसायांना सरकारने परवानगी दिली आहे. मात्र अद्याप मंगलकार्यालये, मंडप डेकोरेटर्स आणि त्यावर आधारीत उद्योगाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचा फटका या व्यावसायिकांना बसतो आहे. सोबत व्यावसाय सुरू नसल्याने बँकेचे कर्ज फेटायचे कसे असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला असून, बँकांकडून कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हंटले आहे.