नाशिक - मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील जवळपास 212 परप्रांतीय मजुरांना आज विशेष बसद्वारे नाशिकरोड येथे रवाना करण्यात आले. तेथून श्रमिक विशेष रेल्वेने या सर्वांना उत्तरप्रदेश, झारखंड या राज्यात पाठविण्यात आले. यावेळी नांदगावचे तहसीलदार योगेश जमदाडे, मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
देशभरातून कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू होते. शासनाने त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष बससेवा व श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. त्याच माध्यमातून मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष पास उपलब्ध करून पाठवले जात आहे. त्या माध्यमातून आज नाशिक येथून सुटणाऱ्या श्रमिक रेल्वेने जाण्यासाठी विशेष बसने या मजुरांना रवाना करण्यात आले. आज शहरातील चांदवड रोड येथून या सर्वांचे मेडीकल करून त्यांना जेवण देऊन त्यांच्यासोबत खाण्याचे पॅकेट देण्यात आले. शहरातील विविध भागात अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान येथून परप्रांतीय मजूर कामाला आलेले आहेत.
कोरोनाचा महाभयंकर आजार आल्यानंतर सर्वच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर काही दिवस काढल्यानंतर त्यांच्या जवळील पैसे व अन्नधान्य संपले. यानंतर त्यांच्या खाण्याची व्यवस्था शासनाने केली होती. शासनाने जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर दोन दिवसात या सर्वांची मेडिकल करून या सर्वांना आज नाशिकपर्यंत बसने तर तेथून विशेष श्रमिक रेल्वेद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात आले.
तालुक्यातील परप्रांतीय विशेष रेल्वेने रवाना
मनमाड, नांदगाव यासह तालुक्यातील ग्रामीण भागात रहाणारे परप्रांतीय मजूर हे संचारबंदीत अडकून पडले होते. शासनाने त्यांना जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर त्या सर्वांचे मेडीकल करून आज विशेष बसने नाशिक व तेथुन श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.यानंतर कोणी बाकी असेल, तर त्यांनी तहसील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार योगेश जमदाडे आणि मुख्याधिकारी दिलीप मेणकर यांनी केले आहे.