नाशिक - लासलगाव जळीत कांड प्रकरणात कलम 304 (2) नुसार मुख्य संशयित आरोपी रामेश्वर भागवत याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. गुन्ह्यातील आरोपी पेट्रोल पंप चालक फरार असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल. घटनेत एकमेकांना मारण्याचा हेतू नव्हता, झटापटीतच हा प्रकार घडला असल्याचा जबाब पीडितेने दिला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली.
15 फ्रेबुवारीला लासलगावच्या एस.टी.बस स्थानकावर झालेल्या झटापटीतून हे कृत्य झाल्याची माहिती संंबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत जवळपास 67 टक्के भाजलेल्या पीडित महिलेवर सुरुवातीला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि नंतर मुंबईच्या भायखळा येथील मसिना रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी (दि.21 फेब्रुवारी) रात्री उशिरा या महिलेचा मुंबईत मृत्यू झाला. जे.जे.रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्यावर लासलगावच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी अटक असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि परिवारातील एकाला सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी मृत महिलेच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी अटकेत असून पेट्रोल पंप व्यवस्थापक अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
हिंगणघाट घटनेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर बाटलीत पेट्रोल देण्यास सरकारने बंदी घातली आहे. मात्र, या निर्णयाची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने अनेकदा अशी प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल पंपाबाबत कठोर धोरण अवलंबण्याची गरज आहे.
हेही वाचा - आमचं चुकलचं.. सदाभाऊ खोतांवर काय म्हणालेत राजू शेट्टी