नाशिक - जीवनावश्यक वस्तुंची विक्री करताना मालाची साठेबाजी करणाऱ्या, कृत्रिम भाववाढ करू पाहणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांच्या विरोधात पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेश करण्यासाठी जिल्ह्यात पथके नेमण्यात आलेली आहेत. या पथकांनी आज (शनिवारी) ३७ दुकानांवर धाडी घालत २ दुकाने सील केली असल्याची माहिती, अशी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्या नियोजनाखाली राबवलेल्या स्टींग ऑपरेशनच्या धडक मोहिमेत धान्य वितरण अधिकारी यांनी १०, तहसीलदार नाशिक यांनी ७, तहसीलदार दिंडोरी यांनी १० व तहसीलदार सुरगाणा यांनी ५ अशा एकूण ३२ किराणा दुकानदार, होलसेल आणि रिटेल दुकानदार यांची तपासणी पथकांमार्फत करण्यात आली. त्यात नाशिक येथील सुभाष नगरातील होलाराम ॲंड सन्स, नाशिकरोड आणि कालिका मंदीर येथील स्वस्त धान्य दुकान क्र. १२४ यांची दुकाने तपासणी पथकामार्फत सील करण्यात आलेली आहेत.
जिल्ह्यातील संचारबदीच्या स्थितीचा गैरफायदा घेऊन जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी, कृत्रीम भाववाढ करणाऱ्या किराणा दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांच्याविरुध्द कठोर कारवाई पुरवठा विभागमार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा आहे. तसेच कोणत्याही किराणा दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांनी साठेबाजी किंवा ज्यादा किमतीस वस्तुची विक्री करू नये, तसे केल्यास त्यांचे विरुध्द कठोर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.