नाशिक - जिल्ह्यातील सटाणा शहराच्या आराई येथे अनेक ठिकाणी डिग्री नसताना डॉक्टरकीचा व्यवसाय मोठ्या थाटामाटात सुरू आहे. त्यामुळे येथे अचानक वैद्यकीय पथकाने बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकल्याने सटाणा तालुक्यात एकच खळबळ उडाली. या कारवाईमुळे सटाणा तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे
गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून सटाणा तालुक्यातील आराई या गावात बोगस डॉक्टर के. डी. गोसावी याने आपला वैद्यकीय व्यवसाय थाटला होता. या दवाखान्याची कुठलीही परवानगी नव्हती, तर आरोग्य विभागाने कोणतीही चौकशी केली का नाही, असा प्रश्न ग्रामस्थ तसेच सरपंचांनी उपस्थित केला. या डॉक्टरने ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती.
मागील काही दिवसांपूर्वी एका पेशंटला उपचारानंतर रिअॅक्शन आल्याने ग्रामस्थांना डॉक्टर बोगस असल्याचा संशय आला होता. त्यावेळेस त्यांनी प्रशासनाला पत्र व्यवहार करून तक्रारदेखील केली होती. परंतु, पत्र व्यवहाराला कुठलेही उत्तर मिळत नव्हते. तसेच, कुठलीही कारवाई होताना दिसत नव्हती. म्हणून, ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी गट विकास अधिकारी सटाणा यांच्या पथकाने आज (९ एप्रिल) दुपारी १ च्या दरम्यान बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकला.
छापा टाकल्यानंतर हा डॉक्टर बोगस असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी हेमंत आहेराव यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्याकडे औषधे आणि प्रमाणपत्र आढळून आले आहेत. याबाबत सर्व कागदपत्रे आणि औषधे यांचा पंचनामा करून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले आहेत. संबंधित डॉक्टरचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत झाले असून त्याच्याकडे बोगस डिग्री मिळाली आहे. त्यामुळे आतातपी आरोग्य विभागाने डॉक्टरवर पोलिसात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.