नाशिक- आक्षेपार्ह फोटो व्हाट्सअॅपवर पाठवण्याची धमकी देत तरुणीकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तरुणी आणि संशयित हे दोघेही मुंबई येथील एका नामांकित फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहेत. एकाच कंपनीमध्ये असल्याने दोघांचे मोबाईलवर नेहमी बोलणे होत होते. संशयिताने पीडित तरुणीला अविवाहित असल्याचे सांगितले होते. दरम्यान, या दोघांमधील ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर संशयिताने पीडितेला तिचे काही फोटो व्हाट्सअॅपवर पाठवण्यास सांगितले. प्रेमात विश्वास असल्याने तिने देखील त्याला फोटो पाठविले. त्यानंतर संशयित वेळोवेळी काहीतरी कारणे देत पैशाची मागणी करायचा. संशयित लग्न करणार असल्याने पीडित युवतीही त्याला पैसे देत होती.
युवतीने जेव्हा कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांशी संशयित आरोपीबद्दल चर्चा केली असता, तो विवाहित असल्याची माहिती पुढे आली. याबात पीडिताने त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने लवकरच पत्नीला घटस्फोट देणार असून आपण लग्न करू असे सांगितले आणि आणखी पैशांची मागणी केली. मात्र, यावेळेस तरुणीने पैसे देण्यास नकार दिला व आधी दिलेले पैसे परत मागितले. याला चिडून संशयिताने युवतीला पैसे न दिल्यास तीचे आक्षेपार्ह फोटो व्हाट्सअॅपवर तिच्या भावाला पाठवण्याची धमकी दिली आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
त्याच्या धमकीनंतरही युवतीने पैसे न दिल्याने संशयिताने तिचे आक्षेपार्ह फोटो तिच्या सख्ख्या भावाला व्हाट्सअॅपवर पाठवले. त्यानंतर मात्र, पीडितीने घडलेला सर्व प्रकार भावाला सांगितला. भावाने देखील बहिणीच्या मागे ठामपणे उभा राहत संशयिता विरोधात नाशिकच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव व महिला उपनिरीक्षक के एस वर्मा करीत आहे.