नाशिक- जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्या वतीने आज रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, संभाजी चौक, नाशिक या संस्थेच्या प्रांगणात सकाळी साडे दहाला या महोत्सवाचे उदघाटन होणार असून शेतकरी आणि ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले आहे.
रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या, फूलभाज्या इत्यादी रानभाज्या पावसाळ्याच्या सुरवातीला आढळून येतात. त्या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रानभाज्या महोत्सवामध्ये आदिवासीबहूल भागातील रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच विक्री करण्यात येणार आहे. त्याबरोबरच रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व, लागवड, विविध प्रक्रिया, पाककृती याबाबत त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. याद्वारे रानभाज्यांना प्रसिद्धी मिळवून त्यांची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण करणे शक्य होईल. तसेच त्यातून आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शहरातील नागरिकांनी कोरोनाच्या बाबतीतील नियम पाळून या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन पडवळ यांनी केले आहे.
हेही वाचा- नाशिकच्या धरणात केवळ 45 टक्के पाणीसाठा; पालकमंत्री भुजबळांनी दिले पाणी कपातीचे संकेत