नाशिक - येथील त्रंबकेश्वरमधील एका लॉजमध्ये दोन झोडप्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवार (दि. 18 डिसेंबर)रोजी घडली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील गौरव जितेंद्र जगताप (वय, 29) आणि नेहा गौरव जगताप (वय, 23) (रा. अनमाेल नयनतारा साेसायटी, पाथर्डी फाटा) या दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. (Husband Wife Suicide at Trambakeshwar) कर्जबाजरीपणा आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गौरव आणि नेहाचा दाेन वर्षांपूर्वीच विवाह झाला हाेता. गाैरवने कंपनीतील काम काही दिवसांपूर्वी थांबवले असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.
तेव्हा घटना समजली - मावशीने गौरवच्या लहान भावाला फ्लॅटवर पाठवले. दरवाजा उघडत नसल्याने फ्लॅटचा दरवाजा तोडून आत पाहिले असता दोघांनी गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली काढून पंचनामा केला. आर्थिक कारणातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नोकरी नसल्याने आर्थिक विवंचना निर्माण - दोन वर्षांपूर्वी गौरवचा विवाह नेहा यांच्याशी थाटामाटात झाला होता. गौरव हे सातपूर येथील पेडीलाईट कंपनीत नोकरीला होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच गौरवची नोकरी गेली होती. त्यामुळे तो तणावात होता. नोकरी नसल्याने आर्थिक विवंचना निर्माण होऊन कर्ज वाढल्याचे समजते. त्यामुळेच दोघांनी संगनमत करुन टोकाचा निर्णय घेतला असावा, असे प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याचे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी सांगितले. याबाबत इंदिरानगर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.