नाशिक - बागलाण तालुक्यातील जायखेडापासून जवळच असलेल्या जयपूर मेंढीपाडे शिवारातील शेतात वीज पडून कांद्याची चाळ व राहत्या घराचे झाप जळून खाक झाले. यात तीनशे क्विंटल कांद्यासह संसारोपयोगी व शेतीउपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. जायखेडा नांदीन रस्त्यावरील जयपूर मेंढीपाडे शिवारातील रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी या शेतकऱ्यांच्या शेतात ही घटना घडली.
सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास जायखेडा परिसरात वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी जयपूर मेंढीपाडे येथील रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी यांच्या शेतातील राहत्या घरावर वीज पडली. यावेळी लागलेली आग झापासह लगतच्या कांदा चाळीपर्यंत पोहोचल्याने घरातील संसारोपयोगी व शेतीउपयोगी साहित्य तसेच कांदा साठवलेली चाळ जळून खाक झाली. यात शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.