नाशिक - लिलावात मिळालेला भाव मान्य नसल्याने शेतमाल परत घेऊन जात असलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडली. याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांनी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव सुरू असताना एका शेतकऱ्याने लिलावात आपल्या कोथिंबिरीला मिळालेला भाव मान्य नसल्याने शेतमाल परत घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी नाशिकच्या महिरवणी भागातील व्यापारी मोहन खांडबहाले याने शेतकऱ्याला कोथिंबीर परत घेऊन जाण्यास मज्जाव करून शिवीगाळ केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुंडागर्दी करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द
व्हिडीओची गांभीर्याने दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांनी बाजार समिती आवारामध्ये गुंडागर्दी करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला आहे. याबाबत बाजार समितीकडून व्यापाऱ्याला पत्र देखील देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. या ठिकाणी शेतमाल लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आता थेट व्यापाऱ्यांकडून माल विकण्यासाठी बळजबरी केली जात असल्याचे समोर आल्यानंतर बाजार समिती सचिवांनी केलेल्या या कारवाईमुळे गुंडागर्दी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच, या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा- नाशकात भक्षाच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत, वनविभागाने पाच तासाने केली सुटका