नाशिक - जिल्ह्याने कोरोनाबधितांच्या संख्येत शंभरी ओलांडली असून मंगळवारी मालेगावमध्ये नव्याने 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याने जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 108 वर पोहचली आहे. तर, एकट्या मालेगावामध्ये आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 94 झाली असून आत्तापर्यंत मालेगावमध्ये कोरोना मुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरातील 11 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी, नाशिक शहरातदेखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 आहे. मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबधितांचा आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचला आहे. यात नव्याने 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मालेगावात आता कोरोना बधितांचा आकडा 94 झाला असून यामुळे 8 जणांचा बळी गेला आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावात असून प्रशासनाने सर्वाधिक लक्ष मालेगाव येथे केंद्रित केले आहे. प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले परिसर सील केले असून येथील नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे. तसेच मालेगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकेबंदी करण्यात आली असून मालेगावातुन बाहेर जाण्यास आणि मालेगावात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.