नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव परिसरात पाचोरा वणी फाट्यावर दुचाकीने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघातामध्ये आठ वर्षीय लहान मुलाच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला, तर आई-वडील आणि २ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाले. ओम राकेश खैरनार असे मृत मुलाचे नाव आहे.
पाचोरा वणी फाट्यावर बुधवार रात्री मालेगावकडून दुचाकीने चार जणांचे कुटुंब नाशिक येथे जात होते. त्याचवेळी डिझेल संपल्याने महामार्गावर बंद पडलेल्या ट्रॅक्टरला खैरनार यांच्या दुचाकीची अंधारात जोराची धडक दिली.
यात दुचाकीस्वार डॉ. राकेश खैरनार (वय ३५), डॉ. मनीषा खैरनार (वय ३२), दक्ष राकेश खैरनार (वय २ ) हे जखमी झाले. तर ओम राकेश खैरनार (वय ८) याचा जागीच मृत्यू झाला. जखमींना पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.