नाशिक - इगतपुरी तालुक्यातील खैरगाव शिदवाडी येथील 68 वर्षीय वृद्ध महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. बुधाबाई चंदर आघाण, असे मृत महिलेचे नाव आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आदिवासी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खैरगावातील शिदवाडीवर शेतात बुधाबाई आघाण यांचे कुटुंब राहते. गुरुवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास बुधाबाई लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. आवाजामुळे बुधाबाईंच्या मुलीने बाहेर येऊन पाहिले व आरडाओरडा केला. यामुळे बिबट्या पळून गेला. मात्र, तोपर्यंत बुधाबाईंचा मृत्यू झाला होता.आघाण कुटुंबाने याची माहिती घोटी पोलीस ठाणे आणि इगतपुरीच्या वन अधिकाऱ्यांना दिली. ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या गावकऱ्यांनी केल्या आहे. बिबट्याकडून नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे वन विभाग येथे तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
नाशिकमधील निफाड, सिन्नर, इगतपुरी बिबट्याचे हॉटस्पॉट -
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येतील. या तालुक्यांतून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित आहेत. नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने या ठिकाणी बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात 200 हून अधिक बिबटे आहेत. अनेकदा बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात.
हेही वाचा - जाती-धर्माच्या भिंती मोडून कोल्हापूरात पार पडला हिंदू-मुस्लिम विवाह सोहळा