येवला - कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिस या आजाराने तोंड वर काढले आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातही म्यूकरमायकोसिस या नव्या आजाराचा शिरकाव झाला आहे. या आजाराचे येवल्यात 4 तर लासलगावमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत. येवल्यातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अविदत्त निरगुडे यांनी याची माहिती दिली आहे. या रुग्णांना पुढील उपचाराकरिता नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आजाराचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
'संसर्गजन्य आजार नाही'
'म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. कोरोना रुग्णांना किंवा कोरोनामुक्त झालेल्यांना हा आजार होत आहे', असे डॉक्टर निरगुडे यांनी म्हटले आहे.
म्युकरमायकोसिसची लक्षणे
रक्ताच्या गुठळ्या होणे, डोळ्याखाली तीव्र वेदना होणे, डोळ्यांच्या आजुबाजूचा भाग सुजणे, डोळ्याखाली काळे व्रण पडणे, नाकाला खाज येणे, नाकातून रक्त येणे, अंधुक दिसणे, चेहऱ्यावर वेदना होणे, डोके दुखणे, गालांवर सूज येणे, चावताना दात दुखणे, श्वास घेताना त्रास होणे, हिरड्यांना त्रास जाणवणे ही म्यूकरमायकोसिस आजाराची लक्षणे आहेत. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित तपासण्या करुन उपचाराकरिता दाखल व्हावे, असे येवला येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अविदत्त निरगुडे यांनी सांगितले आहे.
'कोरोना, मधुमेह रुग्णांनी घ्यावी काळजी'
'नाकाच्या आजुबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये म्यूकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असल्यास ती वेगाने वाढते. पुढे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे आणि कधी मेंदूपर्यंत पसरते. लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारांची गरज असते. अन्यथा एक ते दोन आठवड्यात ही बुरशी डोळे आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकते. यात जबडा, डोळा शस्त्रक्रिया करून काढावा लागू शकतो. तर प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे तोंड व डोळे यांची तपासणी नियमित करावी. त्यातही ज्यांना मधुमेह असेल त्यांनी तातडीने तपासणी करावी', असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
हेही वाचा - काँग्रेसच्या माजी आमदार पुत्राची कोविड सेंटरमधील डॉक्टरला मारहाण