नाशिक - सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४ भाविक ठार झाल्याने खळबळ उडाली. गणेश भक्तीप्रसाद ठाकूर, कुणाल कैलास ठाकूर, आशिष माणिक ठाकूर, सागर अशोक ठाकूर हे चार तरुण अपघातात जागीच ठार झाले आहेत. हा अपघात वणीजवळील कृष्णा गावाशेजारी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला.
भाविक सप्तश्रृंगी गडावर नवसपूर्ती करण्यासाठी गेले होते. तेथून रात्री उशीर झाल्याने नाशिकला परतताना कृष्णा गावानजीक आयशर गाडीचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाने गाडी रस्त्यातील गतिरोधकाजवळ थांबविली. त्यामुळे काही भाविक गाडीतून उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. या धडकेत चार जण जागीच ठार झाले तर इतर वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुष व महिलांसह लहान मुलांचा समावेश आहे.