येवला (नाशिक) - जालन्यातील शिराढोन (ता.अंबड) येथून आपल्या उंटगाड्यासह आलेल्या येवला तालुक्यातील चिचोंडी येथील बहुरूपी समाजाच्या पाच कुटुंबांना वैद्यकीय तपासणीनंतर गावाबाहेर विलगीकरण करण्यात आले. हे सर्व 28 जण असून त्यांना गावाबाहेर राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चिचोंडी येथील असलेले बहुरूपी समाजातील हे कुटुंब पोटापाण्याच्या निमित्ताने भटकंती करत असतात. ते शक्रवार (दि. 5 जून) रोजी आपल्या कुटुंबकबिल्यासह गावात आले. येथील सरपंच, पोलीस पाटील, वैद्यकीय कर्मचारी यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे की नाही, याची खात्री करून घेतली. ते ज्या भागातून आले तो भाग रेड झोनमध्ये येत असल्याने त्यांना गावात प्रवेश न देता गावाबाहेर विलगीकरण होण्याचा सल्ला दिला.
त्यांच्यासोबत दहा उंट, घोडे, ऊंट गाड्या असा मोठा लवाजमा असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या सांगण्यानुसार गावाबाहेर करण्यात आली. त्यांच्या खाण्याची विचारणा करत त्यांच्याकडे चार-पाच दिवस पुरेल इतके धान्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्यासाठी किराणा मालाचे किट मदत म्हणून गावकऱ्यांककडून देण्यात आले.
हेही वाचा - कंत्राटी सफाई कामगारांचे 'अर्धदफन' आंदोलन, मानधनवाढीची मागणी