नाशिक - विनापरवाना उत्पादन सुरु असलेल्या हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरची किंमत २२ हजार ५०० रुपये आहे.
सोनाली पिंजरकर यांच्या (गोदावरी रो बंगलो कलानगर, अमृतधाम) येथील राहत्या घरात मे. गोल्डन ओशन कॉस्मेटिक्स या संस्थेच्या नावे विनापरवाना हॅण्डसॅनिटायझर आणि हॅण्डवॉशचे उत्पादन आणि वितरण होत होते. याबाबत संबंधित विभागाला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार औषध निरीक्षकांनी छापा टाकला असता प्रक्रियेसाठी लागणारा उत्पादन परवाना नसल्याने हॅण्ड सॅनिटायझर, हॅण्ड वॉश, कच्चा माल आणि पक्का मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहआयुक्त (औषधे) दुष्यंत भामरे यांनी दिली.
हेही वाचा - ताडोबाजवळील कोळसा खाणीला विरोध; आदित्य ठाकरेंचे केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकरांना पत्र
पिंजरकर त्यांच्या राहत्या घरात विनापरवाना हॅण्डसॅनिटायझर आणि हॅण्डवॉशचे उत्पादन करुन विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याबाबत सखोल चौकशी केली असता ही संस्था ब्ल्यु गोल्ड सॅनिटायझर आणि क्लिन गोल्ड हॅण्डवॉश या नावाने उत्पादन करुन त्याचे वितरण व विक्री करीत होती. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचे नमुने चाचणी आणि विश्लेषणासाठी औरंगाबाद येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.