नाशिक - चांदवड तालुक्यातील दुगावमध्ये राहणाऱ्या एका नऊ वर्षीय मुलावर 10 ते 15 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मुलाला गंभीर जखमा झाल्या असून तो मागील 20 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. या हल्ल्यात मुलाला एक पाय गमवावा लागला आहे.
काय घडलं...
चांदवड तालुक्यातील दुगाव या गावात राहणारा 9 वर्षीय अनिकेत सोनवणे सकाळच्या सुमारास आपल्या वस्तीजवळच मळ्यात खेळत होता. तेव्हा अचानक दहा ते पंधरा भटक्या कुत्र्यांच्या झुंडाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्याने त्या कुत्र्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वच कुत्रे अनिकेतच्या अंगावर तुटून पडत चावा घेऊ लागले. तो मोठ्या मोठ्याने ओरडू लागला. तेव्हा शेजारील नागरिक ही धावून आले. मात्र तो पर्यत अनिकेतच्या संपूर्ण अंगावर कुत्र्यांनी जखमा केल्या होत्या. रक्तबंबाळ झालेल्या अनिकेतला नागरिकांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. तो पर्यंत अनिकेत बेशुद्ध झाला होता.
भटके कुत्रे ग्रामीण भागात सोडले जातात...
शहरातील भटके कुत्रे पकडून ग्रामीण भागत सोडले जातात. त्यामुळे हे कुत्रे थेट हल्ला करतात. प्रशासनाने जर आशा कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर आज माझ्या मुलावर ही वेळ आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया अनिकेतचे वडील सोपान सोनवणे यांनी दिली.
आतापर्यत सात शस्त्रक्रिया...
अनिकेतवर आतापर्यंत सात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यात त्याचा पाय पूर्णपणे निकामी झाला होता. त्यामुळे त्याचा पाय पूर्ण काढावा लागला आहे. अजूनही अनेक शस्त्रक्रिया त्याच्यावर कराव्या लागतील. कारण त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत. मात्र तो उपचाराला प्रतिसाद देत असल्यामुळे तो यातून वाचला आहे.
भटक्या कुत्र्यांनी आतापर्यत अनेकांवर हल्ले केलेत. मात्र तरीही प्रशासन त्यांचा बंदोबस्त करत नाहीये. जर बंदोबस्त केला असता तर आज इतक्या लहान वयात अनिकेतला आपला पाय गमवावा लागला नसता, असे अनिकेतच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - ओबीसी आरक्षण : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद काढणार तालुकावार मोर्चे
हेही वाचा - आहेरगावच्या जवानावर शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार; हृदयविकाराने झाला होता मृत्यू