नाशिक : राजस्थानातून उंटांना बाहेर नेण्यास बंदी आहे. तरी देखील आठ दिवसापूर्वी 154 उंट हे नाशिकमध्ये दाखल झाले. त्यातील आठ उंटांचा मृत्यू झाला. या घटनेने प्रशासन खडबडून जागी झाले. स्वतः महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात उंटाची वाहतूक करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. नेमके हे उंट राजस्थान मधून कोठे चालले होते, याबाबत अद्यापही स्पष्टता आली नसली तरी प्राणीप्रेमींच्या म्हणण्यानुसार हे सर्व उंट कत्तलीसाठी हैदराबादला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
उंट मायभूमीत परतणार : नाशिक शहरासह जिल्ह्यात दाखल झालेल्या एकूण 146 उंटांना त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात पोहोचवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर राजस्थानच्या सिरोही मधील महावीर कॅमल सेंचुरी तसेच श्रीमद राजचंद्र मिशन या दोन संस्थांनी प्रशासनाकडे संपर्क साधला आहे. रामचंद्र मिशनकडून उंटांच्या वाहतुकीकरिता मदत केली जाणार आहे, तर सेंचुरीमध्ये या उंटांचे पुनर्वसन होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कागदपत्रे शासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने उंटांच्या नाशिक ते राजस्थान प्रवासाचे पत्र तहसीलदार व पशुसंवर्धन उपायुक्त यांना दिले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उंटांना बाहेर नेण्यास बंदी : राजस्थानचा राज्यप्राणी असलेल्या उंटांची संख्या दिवसेंदिवस वेगाने घटत आहे. यामुळे राजस्थान सरकारने 2015 सालापासून उंट संवर्धन संरक्षण कायदा अस्तित्वात आणला आहे. या कायद्यानुसार राजस्थानाबाहेर उंटांना नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशातील सुमारे 85 टक्के उंट राजस्थान मध्ये आढळतात. यानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. उंटांचे प्रजनन हे मात्र राजस्थान आणि गुजरातमध्येच होते.
तीन राज्यांचे पोलीस देणारे एस्कॉट : महावीर कॅमल सेंचुरीकडून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा तिन्ही राज्यांच्या पोलीस प्रमुखांसोबत पत्रव्यवहार करून उंटांचा कळप सिरोहीपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षितेकरिता पोलीस एस्कॉर्टची मागणी केली आहे. या तीनही राज्यांकडून पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. उंटांचा पायी प्रवास दीड महिन्यांचा राहणार आहे. यात नाशिक-पेठ- धरमपूर-बार्डीली-कर्जन-बडोदा -अहमदाबाद-मेहताना-पालनपुर-अंबाजीमार्गे सिरोही जिल्ह्यातील कॅमल सेंचुरीपर्यंत प्रवास असणार आहे.
हेही वाचा : Monkeys Terror: माकडांच्या कळपाची दहशत.. वृद्ध महिलेवर केला हल्ला.. उपचारादरम्यान मृत्यू
हेही वाचा : Video गावात ४५ हत्तींचा कळप तळ ठोकून.. ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण